सृजन

अश्वथाम्यासारखी एक भळभळणारी जखम माझ्या ही माथी आहे. युगान् युगे गेली तरी त्या जखमेसोबत जगणं अवघड वाटत आहे. एकांत वासात, अज्ञात वासात राहून मुक्तीचा मार्ग निवडावा. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपण आता तयार आहोत असे ज्या क्षणी वाटते नेमका तोच क्षण असतो, माथ्यावरच्या भळभळणाऱ्या जखमेची अचानक एक खपली उडते. ठणक अशी उठते की रंध्रारंध्रापर्यंत यातनांची शृंखला तयार होते. हृदयात पोहचताच हृदय पाझरू लागते. मस्तिश्काकडून आज्ञा मिळते, पद्मासन मांडू नको. अजून थोडा अवकाश आहे. अजून यातना बरोबर परमार्थाला साधण्याचा या नश्वर इंद्रीयांना आभ्यास व्हायचा आहे. सहाजिकच या सृष्टीच्या चराचरा मध्ये फिरायला हवं,थोड जखमेसाठी तेल मागायला हवं. सृजनशीलतेचे वरदान आहे तर अमरत्वाचा शाप आहे. एक वेळ अश्वथामाला ही उशाप आहे. पण माझ काय अशी कित्येक महाभारते घडणार आहेत.ती फक्त माझ्यासाठी ; याचे मला भान आहे. माझी ताकद ही काही माझी नाही याची मला जाण आहे. पराधीनतेकडून मुक्तीकडे ही शुन्याकडे वाटचाल आहे.

जन्ममृत्यूच्या फेऱ्यात राहून जखमेला भाळी मिरवणे की शुन्याकडे जाऊन शुन्य होणे याचे मला अज्ञान आहे. हि माथ्यावरची जखम फक्त मलाच यातना देत आहे. तिचा दाह तेजस्वी लालबूंद आहे. पहाणाऱ्याला उगवत्या सूर्याच्या लालीमेचा आभास आहे. ती माझ्या भाळावरती नजरा खिळवून ठेवत आहे.माझ्या दिसण्यामध्ये असण्यामध्ये भवसागर आहे. मी कुडीत बंधिस्त असून कर्माच्या भोवऱ्यात मुक्ती स्थान शोधत आहे.मळलेल्या वाटेवरती मुक्ती साठी तरी कुठे वेळ आहे. तार्किक जगण्याचेही मला वावडे आहे. मी अपूर्ण संपूर्णच्या शोधात भटकत आहे. या वाटेवरच्या पथिकाकडून कोण कर्माची अवघड वळणे सुलभ करुन घेत आहे. मी अज्ञानी अनंताचा प्रवासी या पोषितांच्या सोबतीने मोक्ष मिळवणार आहे. त्या परे अनंत पाहणार आहे.

उत्तरायण

(हायकू)

पर्ण झडला

कासावीस तो काव

नवा पालव।

कच्चा मोहर

सुगंध दरवळ

नाद कोकीळ।

रंग बहवा

हा पळस पांगीर

गुलमोहर।

चैत्र पाडवा

शक शालीवाहन

नव वहन।

आम सुगंध

मृगजळ पवन

का उपवन।

ही तगमग

ग्रीष्माची न्यारी तऱ्हा

भेगाळ धरा।

गीरी बोडका

कासावीस जीवन

उत्तरायन।

उधळण

नसेल पाणी, नसेल रंग

असेल जरा अंतर,

नसेल साथ, नसेल राग

असेल जरा तरंग,

नसेल उधळण, नसेल वसंत

तरीही असेल होळी

असता उर्मी, असता उत्सव

रंगपंचमी खेळी

हेर

निशाचर आम्ही, निशाचर आम्ही,

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

शशी नको आम्हास साथी

रवीची न आम्हास गोडी

जागण्यास रात्र थोडी

लटकणार आम्ही, भटकणारे आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

प्रकाशाचे शिलेदार निद्रिस्त

सावजाची निद्रा न भंगीस्त

आवाज दाबून भक्क्ष फस्त

स्वैर आम्ही, निर्भय आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

काळोख भेदे नजर तांत्रिक

काळरात्री विहार मांत्रिक

जग हे अचंबित यांत्रिक

मुसद्दी आम्ही, शिकारी आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

सत्याची आहे आम्हास चाड

प्रकाशाचा खेळ नजरेआड

काळी जादू भलतीच द्वाड

स्वराज्यात अनामिक आम्ही, अज्ञात आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

छत्रपतींची आम्हास शान

मातीची आम्हास आण

स्वराज्याची आम्हास तहाण

सह्यकड्याचे कातळ आम्ही,शत्रूचे काळ आम्ही

शिवबांचे बहिर्जी आम्ही, शिवबाचे बहिर्जी आम्ही।

गर्व तो मराठी

माझ्या मराठीचा रंग

निराळा ढंग

हेल,सूर बोले भूभाग

बोलीचा गंध

माझ्या मराठीचा स्वाद

गीतार्थ आळंदीत

ज्ञान ज्ञानियाचा संवाद

तृप्त प्राकृत

माझ्या मराठीचा बोध

डुबकी इंद्रायनीत

भोळा भाबडा भक्त अबोध

डोले जन अभंगात

माझ्या मराठीचा मान

घुमतो सह्याद्रीत

लाल,काळ्या मातीचा टिळा लेवून

राखतो तख्त हिंदुस्थान

ओळख

गाव मातीत घर,

विना पाटीच घर,

परिचित परिसरात वडिलांच्या नावान होतं।

विस्तारल्या शिवारात,

आक्रसल्या सुविधात,

एक सुप्त ध्येय जागत होत

उंच उंच स्वप्नांचं ,

चमचमत्या सुखांच,

एक शहर खुणावत होतं।

गंधाळल्या मातीचं,

सळसळता धुंद वायुचं ,

बेभान काहीच कुठे बांधत नव्हत।

एक वेड भिरभिरतं,

सुख चैन हरवतं,

लोंढ्यात लुप्त होऊ पहात होतं।

धडधडत्या यंत्रात,

गुदमरल्या धुक्यात,

नवं विश्व मुळ धरत होत।

मी, माझे,मला,

काही तरी गवसलं,

म्हणता म्हणता बेधुंद काही बिनसलं।

हळूहळू सार सुटलं,

घड्याळाने तारांबळल,

ओळख ओळखपत्राने ओळखत राहील।

पंचतारांकित खुराड्यात,

स्वैर मन शहरात,

धावताना उद्देश विसरत होतं।

साधी भोळी माणसं,

रसाळ, मधाळ वडीलमाणसं,

ओढ लागूनी सतत मन जाई गावात।

कधी वृक्षवल्ली सवंगडी,

गाढ झोपेत स्वप्नात गढी,

एक एकटाच ओळखीच्या शहरात।

फिरूनी शोधत मुळ गावात,

मी तसा अनोळखी गावात,

पडक्या भिंती मिरवती ओळख माझी गावात।

नक्षत्र आभा

मृग अंगणी आला

घेऊन कौतुकाच्या आणा

स्वाती, हस्ती, रेवती, मघा

आळवती मेघांच्या ताणा

बळीला चकवा शुभ्र नभा

खेळशी तारका नक्षत्र आभा

अंगणी गतप्राण मृग भास्करा

पावसाची ओढ भेगाळली धरा

जेष्ठ, आषाढ , श्रावण सुका

अवचित ढग फोडूनी आला भादवा

गुढ नक्षत्रांचा खेळ झाला

अवनीवरी इन्द्रधनुच्या धावा

रानीवनी तग न धरला

घरीदारी डुंबून राहीला

हिरवे स्वप्न हिरवा रंग इरला

असा कसा दाता पु्ंजी लुटून गेला

बळीचा बळी भाळी लेखला

मिटवूनी रेखा हाती चॅंद्र देखला