जननी

अश्वथाम्यासारखी एक भळभळणारी जखम माझ्या ही माथी आहे. युगान् युगे गेली तरी त्या जखमेसोबत जगणं अवघड वाटत आहे. एकांत वासात, अज्ञात वासात राहून मुक्तीचा मार्ग निवडावा. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपण आता तयार आहोत असे ज्या क्षणी वाटते नेमका तोच क्षण असतो, माथ्यावरच्या भळभळणाऱ्या जखमेची अचानक एक खपली उडते. ठणक अशी उठते की रंध्रारंध्रापर्यंत यातनांची शृंखला तयार होते. हृदयात पोहचताच हृदय पाझरू लागते. मस्तिश्काकडून आज्ञा मिळते, पद्मासन मांडू नको. अजून थोडा अवकाश आहे. अजून यातना बरोबर परमार्थाला साधण्याचा या नश्वर इंद्रीयांना आभ्यास व्हायचा आहे. सहाजिकच या सृष्टीच्या चराचरा मध्ये फिरायला हवं,थोड जखमेसाठी तेल मागायला हवं. सृजनशीलतेचे वरदान आहे तर अमरत्वाचा शाप आहे. एक वेळ अश्वथामाला ही उशाप आहे. पण माझ काय अशी कित्येक महाभारते घडणार आहेत.ती फक्त माझ्यासाठी ; याचे मला भान आहे. माझी ताकद ही काही माझी नाही याची मला जाण आहे. पराधीनतेकडून मुक्तीकडे ही शुन्याकडे वाटचाल आहे.

जन्ममृत्यूच्या फेऱ्यात राहून जखमेला भाळी मिरवणे की शुन्याकडे जाऊन शुन्य होणे याचे मला अज्ञान आहे. हि माथ्यावरची जखम फक्त मलाच यातना देत आहे. तिचा दाह तेजस्वी लालबूंद आहे. पहाणाऱ्याला उगवत्या सूर्याच्या लालीमेचा आभास आहे. ती माझ्या भाळावरती नजरा खिळवून ठेवत आहे.माझ्या दिसण्यामध्ये असण्यामध्ये भवसागर आहे. मी कुडीत बंधिस्त असून कर्माच्या भोवऱ्यात मुक्ती स्थान शोधत आहे.मळलेल्या वाटेवरती मुक्ती साठी तरी कुठे वेळ आहे. तार्किक जगण्याचेही मला वावडे आहे. मी अपूर्ण संपूर्णच्या शोधात भटकत आहे. या वाटेवरच्या पथिकाकडून कोण कर्माची अवघड वळणे सुलभ करुन घेत आहे. मी अज्ञानी अनंताचा प्रवासी या पोषितांच्या सोबतीने मोक्ष मिळवणार आहे. त्या परे अनंत पाहणार आहे.

उत्तरायण

(हायकू)

पर्ण झडला

कासावीस तो काव

नवा पालव।

कच्चा मोहर

सुगंध दरवळ

नाद कोकीळ।

रंग बहवा

हा पळस पांगीर

गुलमोहर।

चैत्र पाडवा

शक शालीवाहन

नव वहन।

आम सुगंध

मृगजळ पवन

का उपवन।

ही तगमग

ग्रीष्माची न्यारी तऱ्हा

भेगाळ धरा।

गीरी बोडका

कासावीस जीवन

उत्तरायन।

उधळण

नसेल पाणी, नसेल रंग

असेल जरा अंतर,

नसेल साथ, नसेल राग

असेल जरा तरंग,

नसेल उधळण, नसेल वसंत

तरीही असेल होळी

असता उर्मी, असता उत्सव

रंगपंचमी खेळी

हेर

निशाचर आम्ही, निशाचर आम्ही,

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

शशी नको आम्हास साथी

रवीची न आम्हास गोडी

जागण्यास रात्र थोडी

लटकणार आम्ही, भटकणारे आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

प्रकाशाचे शिलेदार निद्रिस्त

सावजाची निद्रा न भंगीस्त

आवाज दाबून भक्क्ष फस्त

स्वैर आम्ही, निर्भय आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

काळोख भेदे नजर तांत्रिक

काळरात्री विहार मांत्रिक

जग हे अचंबित यांत्रिक

मुसद्दी आम्ही, शिकारी आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

सत्याची आहे आम्हास चाड

प्रकाशाचा खेळ नजरेआड

काळी जादू भलतीच द्वाड

स्वराज्यात अनामिक आम्ही, अज्ञात आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

छत्रपतींची आम्हास शान

मातीची आम्हास आण

स्वराज्याची आम्हास तहाण

सह्यकड्याचे कातळ आम्ही,शत्रूचे काळ आम्ही

शिवबांचे बहिर्जी आम्ही, शिवबाचे बहिर्जी आम्ही।

गर्व तो मराठी

माझ्या मराठीचा रंग

निराळा ढंग

हेल,सूर बोले भूभाग

बोलीचा गंध

माझ्या मराठीचा स्वाद

गीतार्थ आळंदीत

ज्ञान ज्ञानियाचा संवाद

तृप्त प्राकृत

माझ्या मराठीचा बोध

डुबकी इंद्रायनीत

भोळा भाबडा भक्त अबोध

डोले जन अभंगात

माझ्या मराठीचा मान

घुमतो सह्याद्रीत

लाल,काळ्या मातीचा टिळा लेवून

राखतो तख्त हिंदुस्थान

ओळख

गाव मातीत घर,

विना पाटीच घर,

परिचित परिसरात वडिलांच्या नावान होतं।

विस्तारल्या शिवारात,

आक्रसल्या सुविधात,

एक सुप्त ध्येय जागत होत

उंच उंच स्वप्नांचं ,

चमचमत्या सुखांच,

एक शहर खुणावत होतं।

गंधाळल्या मातीचं,

सळसळता धुंद वायुचं ,

बेभान काहीच कुठे बांधत नव्हत।

एक वेड भिरभिरतं,

सुख चैन हरवतं,

लोंढ्यात लुप्त होऊ पहात होतं।

धडधडत्या यंत्रात,

गुदमरल्या धुक्यात,

नवं विश्व मुळ धरत होत।

मी, माझे,मला,

काही तरी गवसलं,

म्हणता म्हणता बेधुंद काही बिनसलं।

हळूहळू सार सुटलं,

घड्याळाने तारांबळल,

ओळख ओळखपत्राने ओळखत राहील।

पंचतारांकित खुराड्यात,

स्वैर मन शहरात,

धावताना उद्देश विसरत होतं।

साधी भोळी माणसं,

रसाळ, मधाळ वडीलमाणसं,

ओढ लागूनी सतत मन जाई गावात।

कधी वृक्षवल्ली सवंगडी,

गाढ झोपेत स्वप्नात गढी,

एक एकटाच ओळखीच्या शहरात।

फिरूनी शोधत मुळ गावात,

मी तसा अनोळखी गावात,

पडक्या भिंती मिरवती ओळख माझी गावात।

नक्षत्र आभा

मृग अंगणी आला

घेऊन कौतुकाच्या आणा

स्वाती, हस्ती, रेवती, मघा

आळवती मेघांच्या ताणा

बळीला चकवा शुभ्र नभा

खेळशी तारका नक्षत्र आभा

अंगणी गतप्राण मृग भास्करा

पावसाची ओढ भेगाळली धरा

जेष्ठ, आषाढ , श्रावण सुका

अवचित ढग फोडूनी आला भादवा

गुढ नक्षत्रांचा खेळ झाला

अवनीवरी इन्द्रधनुच्या धावा

रानीवनी तग न धरला

घरीदारी डुंबून राहीला

हिरवे स्वप्न हिरवा रंग इरला

असा कसा दाता पु्ंजी लुटून गेला

बळीचा बळी भाळी लेखला

मिटवूनी रेखा हाती चॅंद्र देखला

महिला सक्षमीकरण

‘महिला सक्षमीकरणसक्षमीकरण हा शब्द प्रश्नचिन्ह निर्माण करतो. स्त्रिया सक्षम म्हणजे कशाप्रकारे सक्षम अपेक्षित आहेत आणि त्यांना सक्षम बनवणारे आहेत तरी कोण ? हे व्यक्ती द्वारे सक्षमीकरण आहे की समुहाद्वारे सक्षमीकरण आहे. ज्या देशामध्ये देवीच्या(स्त्रीच्या) अवयवांची शक्तीपीठे आहेत.हि शक्तीपीठे सर्वांसाठी ऊर्जास्त्रोत आहेत,त्या भूमीतील स्त्रिया असक्षम कशा असू शकताील.हे असे आहे, ‘सूर्याला अग्नीचे दान देणे!’

विवाहसंस्था, पुरुषी वर्चस्व, धार्मिक चालीरीती,कर्मकांड याबद्दलचे व्यक्ती स्वातंत्र्य जे ताराबाई शिंदेनी ‘स्त्री पुरुष तुलना’ या साहित्यातून समाजासमोर आणले होते.ते आजच्या स्त्रीने मिळविले आहे. शिक्षणाने तिला आर्थिक स्वातंत्र्य व सरकारने कायद्याद्वारे सामाजिक ( समान अधिकार या अर्थाने) स्वातंत्र्य दिले आहे.

अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी,बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा सारांश म्हणून जे लोकपाल बिल कायदा म्हणून लागू झाल्यानंतर त्या विधेयकाचा जो काही बदल आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात झाला आहे; काहीसा तसाच बदल स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे सर्व क्षेत्रात आरक्षण, स्त्री समानता याचा सर्वसामान्य स्त्रियांच्या जीवनात झाला आहे.

धर्म हि जशी व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. तशाच प्रकारे आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोणातून येणारी सक्षमता हि सर्वस्वी त्या कुटूंबाची बाबअसते;ज्या कुटूंबाचा ती स्त्री अविभाज्य भाग असते. स्त्रीचे स्वावलंबन व स्त्रीची सक्षमता या भिन्न गोष्टी आहेत. अशिक्षित निराधार स्त्रीचा नवरा व्यसनाधीन झाला तर ती तिच्या मुलांचे जबाबदारीने संगोपन करते.इथे ती सक्षम आहे की नाही? तिच्यावर कुटूंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आली व ती तिने निभावली. अगदी तशाच प्रकारे इंदिरा गांधींवर देशाची जबाबदारी आली व ती त्यांनी समर्थपणे निभावली. प्रत्येक स्त्री सक्षम असते. तिच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या तिला भिन्न बनवतात. जिजाऊंना शिवरायांसारखा युगपुरुष धडविण्याची संधी म्हणा किंवा जबाबदारी लाभली तर पुढे झासीची राणी लक्ष्मीबाई यांना त्याच स्वातंत्र्यासाठी हातात तलवार घेऊन युद्धभूमीवर झुंज देण्याची जबाबदारी लाभली. जिजाऊंना विरमाता त्यांच्या विचारांनी बनविले. त्याच बरोबर शिवबाच्या जडणघडणीत त्यांची साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने घडविले. एक स्वप्न त्यांनी स्वराज्याचे पाहिले व हजारो निष्ठावंतानी त्याला पूर्णत्व दिले.सती, विधवा केशवपण या रूढी समाजाच्या आत्म्यात रूजलेल्या काळात ; राणी लक्ष्मीबाई एक अजरामर विरांगणा ठरते. ती तिचे तिर्थरुप मोरोपंत यांनी दिलेल्या शिक्षणामुळे व स्वातंत्र्यामुळे त्याच बरोबर नानासाहेब पेशव्यांनी युद्धशास्त्रात निपुणता आणण्यासाठी युद्ध कौशल्यच शिकवले नाही तर संघटन करण्याचे धडे ही दिले. हा मनकर्णिकेसाठी एक प्रकारचा राजाश्रय होता.

अती प्राचिन काळात ही विदुषी होऊन गेल्या.गार्गी , मैत्रैयी या ऋषीकन्या होत्या.तर लोपमुद्रा अगस्त ऋषींच्या पत्नी होत्या. ऋषीमुनी स्त्रियांना योग्य तो सन्मान देत असत. अगदी एक दोन शतके मागे वळून पाहिले तर बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया समकालीन स्त्रियांपेक्षा वेगळे कार्य करु शकल्या ते त्यांच्या पालकांच्या पुरोगामी विचारांमुळे ; त्यांना संघर्ष करावा लागला. परंतू पालकांकडून पोषक वातावरण मिळाले. त्यात प्रामुख्याने लेखन क्षेत्रात ताराबाई शिंदे , पंडिता रमाबाई ,इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांनी विशेष योगदान दिले. शिक्षणाबरोबर शस्त्र व युद्ध कौशल्यात निपुण विरांगणा होऊन गेल्या. राणी लक्ष्मीबाई, राणी येसूबाई , राणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपल्या अविस्मरणीय कार्याचा ठसा उमटवला. ब्रिटीशकालिन पारतंत्र्याच्या काळात डॅा. आनंदीबाई, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांनी यांनी स्त्रियांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत लढा देणाऱ्या देशभक्तांनी आपल्या घरातील स्त्रियांना शिक्षणाबरोबर पुरोगामी वारसा ही बहाल केला.

जे पोषक वातावरण पालकाकडून स्त्रीच्या उन्नतीसाठी हवे होते; ते आज. प्रत्येक घरात आहे. शिक्षणासाठी, आत्मनिर्भरतेसाठी किंवा स्वत:ला सिद्ध करण्यासाठीचा सामाजिक संघर्ष अगदीच संपुष्टात आला आहे. तरी आजही स्त्रीत्वाचा दोष, चारित्र्य हनन, स्त्रीवरिल अत्याचाराच्या घटना समाजात काही निकृष्ट धारणेच्या लोकांचे असणे अधोरेखित करते. आणि असे नसते तर १८ जानेवारी २०२३ ला म्हणजे २१ व्या शतकात महिला कुस्तीपट्टूंना लैंगीक छळाच्या विरोधात आंदोलन करावे लागले नसते. या सुप्रसिद्ध महिला शारिरिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या ही सक्षम आहेत. ज्या आज न्यायालयीन लढाईच्या चक्रात अडकल्या आहेत. जगाला जोडणारा सोशल मिडिया , अती अती वेगवान इंटरनेटच्या काळात अखिल पुरूष जातीला लांच्छनास्पद असणारी घटना घडते व जवळ जवळ ४५दिवस जगापासून लपवता येते. मनिपूर मधील दोन स्त्रियांना विवस्त्र करून , परेड करवून ,बलात्कार करणारा व हे दुष्कर्म लपवून ठेवणारा समाज या सुसंस्कृत महान समाजाचा भाग आहे. समाजाला तर सोडा पण प्रशासन व कायद्याला ही न जुमानन्याची हिम्मत येते कुठून? स्त्रियांसाठी किती सुरक्षित हा समाज आहे? स्त्रियांना सुरक्षित वातावरण देणे . याचा व्यवहारात कोणी आदर्श ठेवावा का? नैतिक मुल्य कोणाला शिकवावी व कोणी?

ही मुल्ये कुटूंबात कुटूंबप्रमुखाची नैतिक जबाबदारी असते. असे समाजात कोण असावे? ताराबाई शिंदे म्हणाल्या होत्या , ‘नवऱ्याने बायकोला मान दिला पाहिजे!’ व.पु.चे साहित्य वाचत असताना चक्क एका राजकारणातील व्यक्ती बद्दल वाचणात आले. ते त्यांच्याच भाषेत मांडणे योग्य होईल. “यशवंतरावांची वेणूताई बद्दल कोणती भावना होती. ती एका महत्वाच्या घटनेच्यावेळी फार सुंदरपणे प्रकट झाली. ही हकीगत यशवंतराव ज्या वेळी सांगत त्या वेळी रंगून जात! १९६२ साली चीनी आक्रमणाने भारताची नामुष्की झाली आणि कृष्ण मेननच्या जागी यशवंतराव चव्हाणांना संरक्षणमंत्री पदावर नियुक्त करण्याचे नेहरूनी ठरविले आणि यशवंतरावांना मुंबईत टेलिफोन करून सांगितले. यशवंतरावांना ही सूचना अत्यंत अनपेक्षित होती. काही सेकंद स्तब्दतेने गेले व नेहरूंनी विचारले, “तुमचा काय निर्णय आहे?” “जरा सल्ला घेतो नि सांगतो!” यशवंतराव चटकन बोलून गेले. “कुणाचा सल्ला?” नेहरूंचा चेहरा नक्कीच लालबुंद झाला असणार! कदाचित नेहरूंना चटकन वाटले असेल की मोरारजींचा सल्ला तर नव्हे? यशवंतराव उत्तरले- “माझ्या पत्नीचा -वेणूताईचा!” यशवंतरावांच्या या उत्तराने त्या ताणातही नेहरू दिलखुलास हसल्याचा आवाज फोणवर ऐकू आला !” एका अती महत्वकांक्षी , यशस्वी राजकारण्याने घरातील स्त्रीला आपल्या कार्याची, विचारांची, निर्णयांची सहचारिणी मानले होते हे वरील दाखल्यानी सिद्ध होते.

आपल्या देशामध्ये इतर कोणत्याही संस्थेपेक्षा कुटूंबसंस्था हे व्यक्तीचे अभेद्य कवच सुरक्षा कवच आहे. मग ते एकत्र कुटूंब असो कि विभक्त असो.या प्रत्येक कुटूंबात आजी असेलच असे नाही पण आई असते. आपण वाढत असताना ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे आपल्यावर संस्कार करत असते.ती कधी अकार्यक्षम, असक्षम वाटते का? वाटू शकते ती जर एखाद्या शारिरिक व्याधीने त्रस्त असेल तर; अन्यथा निर्णायक क्षणी सुद्धा तिचा आधार मोठा वाटतो. जर आई असक्षम नाही तर जगातील कोणतीही स्त्री असक्षम नाही.

काय दुर्दैव आहे, जी समाजाच्या उत्पत्तीपासून सक्षम होती.जीने उदरनिर्वाहा साठी बी पेरून उत्पन्न घेता येते म्हणजेच भटकंती थांबवून एका ठिकाणी वसाहत करून शेती पिकवून उदरनिर्वाह करता येतो याचा शोध लावला म्हणजेच तिने माणसाला जनावरा पासून वेगळे अस्तित्व दिले.तिच आता याचक बनून त्याच समाजासमोर उभीआहे. माणसात जनावर पाहते की जनावरात माणूस ;कोण हा दाता बनून तिच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र धडपडत आहे?

अडाणी बहिणाबाई म्हणतात, _

पाहिसनी रे लोकाचे

यवहार खोटे नाटे

तव्हां बोरी बाभईच्या

आले अंगावर काटे

राखोईच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी

नको लागूं जीवा, आता मतलबापाठी”